हिंगोली : गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील नागरिकांनी निर्माल्य ठरवून दिलेल्या ठिकाणी टाकल्यामुळे निर्माल्य गोळा करण्यास सोपे झाले. विसर्जनाच्या दिवशी अडीच टन निर्माल्य निघाले असून ते गांडूळ खत तयार करण्यासाठी प्रकल्पाकडे पाठविल्याची माहिती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने दिली.
औंढा रस्त्यावर नगरपरिषदेच्यावतीने खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. दररोज ओला व सुका कचराही वेगळा करुन प्रकल्पाकडे पाठविला जातो. १० सप्टेंबरला शहरात श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर निर्माल्य एकत्र करून ठेवा, इतरत्र कुठेही निर्माल्य टाकू नका, अशा सूचना गणेश मंडळांंच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शेवटच्या दिवशी म्हणजे श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात आदर्श महाविद्यालयाजवळील पाण्याची टाकी, शिवाजीनगर येथील दत्त मंदिर, एनटीसी मिल परिसर, अग्निशमन कार्यालय, नगरपरिषदेची नवी इमारत अशा ६ ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले होते. जे नागरिक कृत्रिम तलावाच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत, अशांसाठी २ फिरते कुंड तयार करण्यात आले होते. या फिरत्या कुंडावर ठराविक स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील प्रत्येक वाॅर्डात जावून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून निर्माल्य गोळा केले. काही नागरिकांनी चिरागशहाबाबा, कयाधू नदी, जलेश्वर तलाव या ठिकाणी गणेश विसर्जन केले. तेथील निर्माल्य नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र करून निर्माल्य खत प्रकल्पाकडे पाठविले आहे.
स्वच्छता विभागाला सहकार्य करा...
शहरात स्वच्छता रहावी, कुठेही कचरा पडू नये यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वॉर्डात घंटागाडीची व्यवस्था केली आहे. रोज सकाळ, दुपार नियमितपणे घंटागाडी वॉर्डात जाते. तेव्हा नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीमध्ये टाकावा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांंना सहकार्य करावे.
-बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक