हिंगोली : वसमत तालुक्यातील धानोरा शिवारात दोघांकडून ९४ हजार ६०० रूपये किमतीचे चंदनाची ओले ३ लाकडे पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई १८ जुलै रोजी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला.
वसमत तालुक्यातील धानोरा शिवारातील चंदनाचे झाड दोघांनी तोडून ते चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, पोलिस अंमलदार जीवन गवारे, संदिप सुरूशे, बालाजी जाधव, शेख मदार यांच्या पथकाने धानोरा शिवार गाठले. यावेळी पथकाला अंबादास फालाजी कांबळे, अनिल नारायण शिवभगत (दोघे रा. भोगाव ता. वसमत) यांच्याजवळ चंदनाच्या झाडाचे मोठे ओले ३ लाकडे आढळून आली.
चंदनाचे झाड हे संभाजी उर्फ चांदू गोविंदराव राऊत (रा. धानोरा) यांच्या शेतातून तोडून त्याचे तुकडे करून चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ९४ हजार ६०० रूपये किमतीचे चंदनाचे ३ लाकडे, फावडा, कुऱ्हाड. खोरा असा एकूण ९५ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार जीवन गवारे यांच्या फिर्यादीवरून अंबादास कांबळे, अनिल शिवभगत यांचेवर हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अंमलदार जाधव तपास करीत आहेत.