- इस्माईल जहागिरदारवसमत (जि. हिंगोली): शहरात मॉर्निंगवॉक व घरापुढील सडासारवण करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. त्या चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस प्रशासनाने तपास पथक नियुक्त केले होते. तपासात नांदेड येथून एलसीबीच्या पथकाने दोन चोरट्यांसह गुन्ह्यातील ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वसमत शहरात तीन ते चार महिन्यांपूर्वी बँककॉलनी ते कवठा रोड दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील तसेच १४ ऑगस्ट रोजी अंगणात सडा टाकणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा पंडीत कच्छवे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विषेश पथक नेमण्यात आले होते.सदरची कारवाई पोलीस अंमलदार शेख बाबर, पांडुरंग राठोड, विठठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांनी केली. तसेच वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोदणापोड, फौजदार राहुल महीपाळे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि सोनकांबळे, पोशि रवीशंकर बामणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
नांदेड परिसरात मारला छापापोलीस पथकास वसमत येथिल चैन स्नॅचिंगची गोपनिय माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने शिवनगर नांदेड परिसरात पोलिसांनी छापा मारला. यात संशयित आरोपी राहुल प्रदिप जाधव (वय २२, ऑटोचालक रा.शिवनगर नांदेड) व एक विधीसंघर्षग्रस्त बालकयास ताब्यात घेउन सदर गुन्हयासंदर्भाने विचारपूस केली असता आरोपीने वसमत शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याचे कबुल केले. त्यामुळे चोरलेला सोन्याचा मुद्देमाल, सोन्याची ३५ ग्रॅम वजनाची चैन व ५ ग्रॅम वचनाचे मंगळसूत्र, मिनिगंठण किंमत २ लाख,४० हजार व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत ६० हजार व मोबाईल असा एकूण ३ लाखाचा मुददेमाल जप्त केला आहे. आरोपीची अधिक विचारपूस केली असता आरोपीवर यापूर्वीचे जबरी चोरीचे अनेक गुन्हे असून हिंगोलीसह, नांदेड, परभणी जिल्ह्यात जबरीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.