कनेरगाव नाका (हिंगोली ) : तालुक्यातील जयपूरवाडी गावातील दोन घरांनाआग लागल्याची घटना आज दुपारी (दि. ५ ) १२.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
जयपूरवाडी येथील श्रीराम कºहाळे यांच्या लाकडी माळवदाच्या घराला सर्वप्रथम आग लागली. घरातील देवाच्या देव्हाऱ्यातील दिव्याने लाकडाच्या खांबाला आग लागल्याचा अंदाज ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर आगीने उग्र रुप धारण केले. पाहता पाहता शेजारील नागोजी सूर्याजी गाढे यांच्याही घराला आग लागली. या आगीत श्रीराम कऱ्हाळे यांचे लाकडी माळवदाचे घर कोसळल्याने घरातील सर्व साहित्य माळवदाखाली दबले आहे. त्यात कऱ्हाळे यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले. तर नागोजी सूर्याजी गाढे यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी सर्व गाव एकवटले होते. मात्र गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी उपलब्ध नव्हते. ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्नीशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी १ वाजता दाखल झाले. अग्नीशमन दलाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझवली होती.
गावात तीव्र पाणीटंचाईजयपूर वाडी हे गाव फाळेगाव सर्कलमध्ये येते. यंदा परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने जयपूर वाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आग विझवण्यासाठी पाणी आणायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरील शेतशिवारातील विहिरीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाण्याअभावी ग्रामस्थ हतबल झाल्याचे दिसून आले.