डोंगरकडा (जि. हिंगोली) : नागपूरहून महाराष्ट्र दर्शनासाठी निघालेल्या दोन तरुणांचा कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. एकाचा मृतदेह काल रात्री तर एकाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. मृतांमध्ये चालक प्रशांत व नीलेश महेंद्रदास देवमुराद यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र दर्शनादरम्यान तुळजापूरला एमएच २० एफपी २७८८ या क्रमांकाच्या गाडीने पाच जण जात हाेते. यादरम्यान नांदेड-हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा परिसरातील भाटेगाव येथील मच्छी केंद्राजवळ दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी जेवण केले. गाडीचा चालक प्रशांत (पूर्ण नाव माहीत नाही) हा तोंडावर पाणी मारतो म्हणून जवळच्या कालव्यावर गेला. यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो कालव्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र नीलेश महेंद्रदास देवमुराद (वय ३७) गेला असता, त्याचाही पाय घसरून तोही कालव्यात पडला. हे दाेघे वाहून जात असल्याने, त्या दाेघांना वाचविण्यासाठी त्यांचा मित्र अंकित दामोदर टाले याने प्रयत्न केला. मात्र तोही पाण्यात वाहून जाऊ लागला. त्यावेळी जवळच असलेल्या कैलास चव्हाण व त्याच्या मित्रांनी अंकितला सुखरूप कालव्यातून बाहेर काढले.
दरम्यान, वाहून गेलेल्या नीलेश देवमुराद यांचा मृतदेह सायंकाळी सापडला. तर चालक प्रशांतचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. घटनास्थळी आखाडा बाळापूरचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोउपनि. शिवाजी बोंडले, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग यांचे शोधकार्य सुरू हाेते. डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत नीलेश देवमुराद यांचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद आतकूरकर, प्रशांत स्वामी यांनी केले.