लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : मालवाहू ट्रकचे ब्रेक न लागल्याने उलटून जखमी झालेल्या चालकास तातडीने रूग्णालयात दाखल करून कॅबीनमधील २ लाख रुपयांची रोकड बाळापूर पोलिसांनी ट्रकमालकाच्या स्वाधीन केली. प्रामाणिकपणा अन् माणुसकीचे व कर्तव्य तत्परतेचे अनोखे दर्शन घडविले.८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सयुमारास मालवाहू ट्रक क्र.एम.एच.१३- एएक्स ३०१२ हा काचेच्या रिकाम्या बाटल्या वारंग्याहून नांदेडकडे जात होता. भाटेगाव शिवारात तो उलटला. त्यात ट्रक चालक रामराजे पवार हा जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच डोंगरकडा चौकीचे जमादार बी.एल. वडकिल्ले, एस.एस. नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीस डोंगरकड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्या ट्रकच्या कॅबीनमध्ये २ लाख रुपयांची पिशवी मिळाली. सदर घटनेची माहिती ठाणेदार व्यंकट केंद्रे यांना दिली.९ एप्रिल रोजी ट्रक मालक अमित पारसमल कांकरिया व चालक रामराजे पवार (रा.बार्शी सोलापूर) यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना सुपूर्द केले.
दोन लाखांची रोकड केली ट्रकमालकाच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:54 AM