हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील एकास गावठी बनावटीचे स्वयंचलित पिस्टल दोन काडतुसांसह आढळून आल्याने त्यास दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरार झाला आहे. पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मूळचा कळमनुरी येथील इंदिरानगर येथील रहिवासी संजयसिंग गुलाबसिंग बावरी हा सध्या हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता भागात रहिवासी आहे. त्याच्या घरी अवैधरीत्या अग्निशस्त्र ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ सप्टेंबर रोजी दहशतवादविरोधी कक्षाचे सपोनि गजेंद्र सरोदे, पोलीस कर्मचारी धनंजय पुजारी, महेश बंडे, शेख शफियोद्दीन, अर्जुन पडघन, विजय घुगे, चव्हाण आदींच्या पथकाने सापळा रचला. लिंबाळा मक्ता येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या मागील संरक्षक भिंतीला लागून असलेल्या संजयसिंग बावरी याच्या घरात सुनीलसिंग बावरी याच्याकडून झडतीदरम्यान एक विनापरवाना गावठी स्वयंचलित पिस्टल आढळले. तसेच दोन जिवंत काडतुसेही मिळाली. एकूण ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर सुनीलसिंगला ताब्यात घेतले. संजयसिंग मात्र फरार झाला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती सपोनि सरोदे यांनी दिली.