हिंगोली : शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी व हिंगोली शहर ठाण्यातील वाहनचालक या दोन कर्मचार्यांना बनावट नोटा प्रकरणी फसवणुक केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दोघेही विभागीय चौकशीत दोषी आढळ्याने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की, उसतोड कामगार मुकादम लक्ष्मण रामजी बोडखे यांनी ३० आॅक्टोबर रोजी बासंबा ठाण्यात दोन पोलीस कर्मचारी व इतर तिघांनी मिळुन फसवणुक केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून संतोष सुर्यवंशी उर्फ देशमुख उर्फ पाटील, राष्ट्रपाल भिमराव चेवटे, अजय गोवर्धन राठोड, प्रीतम चव्हाण, नवनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर दोन पोलीस कर्मचार्यांची पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी विभागीय चौकशी केली.
चौकशीत वाहतूक शाखेचा प्रीतम भिमराव चव्हाण व हिंगोली शहर ठाण्यातील चालक नवनाथ उल्हास जाधव या दोन कर्मचारी चौकशीत सदर इसमाची फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघाही कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दोघा कर्मचार्यांना भादंवि ३११ (२) (ब) नुसार शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चावरिया यांनी दिली. पोलीस अधीक्षक चावरीया यांनी दोघा कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ केल्याने मात्र पोलीस दलातील असे प्रकार करणार्या कर्मचार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.