सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे रविवारी सांयकाळी गावातील विहिरीमध्ये (पुरातन बारव) दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
उटी ब्रम्हचारी येथील रोजमजूरी करून उदरनिर्वाह करणारे राजकुमार खरादे यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्य आहेत. त्यांची दोन्ही मुले हर्षल राजकुमार खरादे (५), समर्थ राजकुमार खरादे (३) ही दोघे भावंडे रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गावातील महादेव मंदिराच्या परिसरात नेहमी प्रमाणे खेळण्यासाठी गेले होते. पंरतु दोघे भावंडे रात्री ८ वाजेपर्यंत घरी परत आले नाहीच, त्यामुळे ग्रामस्थांनी गावात शोध घेतला. दरम्यान मध्यरात्री गावातील मंदिराजवळील बारवामध्ये हर्षलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर आज सकाळी ग्रामस्थांनी समर्थचा मृतदेह बारवाच्या पाण्यातुन बाहेर काढला.
दोन्ही भावंडांचा खेळण्याचा नांदात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गावा जवळ असलेल्या पुरातन बारवात मोठ्या प्रमाणात पाणी असून दोन्ही निरागस भावंडे एकाच वेळी बुडून मृत्यू पावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. खरादे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आल्याचे फौजदार मोरे यांनी सांगीतले.