लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे २ हजार १९३ आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासना तर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांची शासकीय रूग्णालय किंवा शासनमान्य खासगी रूग्णालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. मातृ वंदना योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० तर ४० टक्के राज्य शासनाचा सहभाग आहे. लभार्थी महिलेस एकूण तीन टप्यात योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.योजनेच्या लाभासाठी महिलांचे बँकखाते आधारलिंक असणे गरजेच आहे. त्यामुळे गरोदर मातांनी योजनेचा लाभासाठी बँकेत खाते आधारला जोडून घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी केले. स्वत:चे व लाभधारक गरोदर मातेच्या पतीचे आधार कार्ड, माता बाल संगोपन कार्ड, बँक खाते तेही आधार संलग्नित असावे, ज्यामुळे लाभधारक गरोदर मातांना अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा करता येणे सोपे होईल. सध्या आॅनलाईनद्वारे गरोदर मातांची अर्ज प्रक्रिया सुरू असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची रक्कम एकूण तीन टप्प्यात लाभधारकाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश योजनेत असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळविणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच सदर योजने अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिलांना लागू आहे.तसेच लाभाची ५ हजार रुपये रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केली जाईल. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच देण्याची तरतूद आहे.रूग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत असून आता माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जात आहे.
‘मातृवंदना’साठी दोन हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:25 AM