सेनगाव : विविध गुन्हे, चोरी प्रकरणात सेनगाव पोलिसांच्या हाती लागलेल्या ३० हून अधिक बेवारस मोटार सायकल मागील सहा वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून आहेत. सदर वाहनाची लिलाव प्रक्रिया होत नसल्याने सर्व दुचाकी जाग्यावरच सडत आहेत.विविध अपघात चोरी या सह प्रकरणात मागील सहा वर्षापासून मूळ मालकाचा शोध व संबंधित दुचाकीची मालकी सिद्ध करणारे पुरावे सादर करू शकले नाहीत. अशा ३० हून अधिक मोटार सायकल सेनगाव पोलीस ठाण्यात पडून आहेत. अनेक वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून राहिलेल्या मोटार सायकलची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे गरजेचे असताना मोठा कालावधी उलटला तरीही मूळ मोटार सायकल मालकाचा शोध लागलेला नाही. तसेच नियमानुसार या बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया होत नसल्याने जवळपास सहा वर्षाच्या कालावधीत जप्त वाहनांची अवस्था भंगार साहित्यासारखी झाली आहे. सद्यस्थितीत सेनगाव पोलीस ठाण्यातील मोकळा असणारा परिसर या वाहनांनी व्यापला आहे. सदर जप्त, बेवारस मोटार सायकलची लिलाव प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे सहा वर्षाचा कालावधी उलटला आहे. यासंबंधी सेनगाव पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता बेवारस मोटार सायकलची पूर्ण माहिती मला नसल्याचे त्यांनी सांगितले.बेवारस मोटारसायकलची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याची गरज असून त्या अनुषंगाने सेनगाव पोलीस ठाण्याचा आवारात असलेल्या मोटार सायकलची लिलाव प्रक्रिया लवकरच पूर्ण करु असे अनेक दिवसांपासून पोलिसांकडून बोलले जात आहे. मात्र त्याच्याही पुढे अजून तपास काय सरकलेला नाही. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे अनेक पार्ट गायब झालेले आहेत.
बेवारस दुचाकी सहा वर्षापासून धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:31 AM