हिंगोली: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोलीमध्ये शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिल्याच निर्धार सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरुन बोचरी टीकाही केली.
हिंगोलीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदार संतोष बांगर यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. 'ज्या गद्दाराला आपण नाग समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही', अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काही कतृत्व नाही. भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात.
त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का? हे नामार्द आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते. इतर पक्षांचे नेते चोरणारे आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद, याला नामर्द म्हणतात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.