हिंगोली : जिल्ह्यात १४ मेपासून देशी दारू विक्रीच्या काही दुकानांना तसेच वाईन शॉपना विक्रीची शिथीलता देण्यात आली होती. त्यामुळे दारूच्या दुकानांवर तसेच वाईन शॉपवर मद्यपींची तुरळक गर्दी दिसून आली. मागील अनेक दिवसांपासून दारू व वाईन शॉप बंद असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होईल व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असे वाटले होते. मात्र प्रशासनाच्या नियोजनामुळे याठिकाणी गर्दीला काही प्रमाणात का होईना आळा बसला. परंतु यावेळी अनेकांनी सोशल डिस्टन्स पाळले तर काहींनी नियमांचे उल्लंघन केले होते. विशेष म्हणजे परवाना नसल्याने अनेक मद्यपींची यावेळी गोची झाल्याचेही दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत बंद असलेली मद्य विक्रीची दुकाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एक दिवसाआड सुरू करण्यास परवानगी मिळाली. परवानानिहाय दुकानांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. मद्य पिण्याचा प्रमाणित परवाना असल्याशिवाय मद्य विक्री होणार नाही, व रांगेतही उभे राहता येणार नाही असे प्रशासनाचे आदेश होते. त्यामुळे विनाकारण होणारी गर्दी टाळण्यास मदत झाली. परवाना नसल्याने अनेक मद्यपींची यावेळी गोची झाल्याचेही दिसून आले.
दारू पिण्याचा प्रमाणित परवाना नसल्यामुळे अनेकजण इतर कोणाच्या जुना परवान्यावर दारू मिळेल का? याचा शोध घेत होते. अनेकजण दारू विकत घेण्यासाठी येत होते. परंतु परवानाच नसल्याने निराशाने परतत होते. शासनाच्या या निर्णयामुळे मात्र गर्दीवर नियंत्रण मिळविता आले हे विशेष. शहरासह ग्रामीण भागातून मद्यपींचा लोंढा शहरात दाखल झाला होता. परंतु अनेकांकडे परवाना नसल्यामुळे देशी दारूची दुकाने किंवा वाईन शॉपवर नेहमीप्रमाणे असणारी गर्दी मात्र कुठेच दिसून आली नाही.