हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. रात्रीपासून वाहून गेलेल्या दोघांचे शोधकार्य रात्रभर सुरु होते. यामध्ये संबंधित महिलेचा आज सकाळी मृतदेह सापडला असून मुलाचा अजूनही शोध सुरु आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके पोटा येथील रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयश पडोळ हे चार जण एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालक योगेशला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. त्याने त्यातूनच गाडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी मध्येच अडकली. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या भागातील ओढ्यांना पूर आले आहेत.
गाडी पाण्यात अडकल्याने योगेश पडोळ, वर्षा पडोळ आणि त्याचा सात वर्षाचा मुलगा श्रेयश पडोळ तिघे उतरले. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तिघेही पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके यांना योगेश पडोळ यांना बाहेर काढण्यात यश आले. पण वर्षा पडोळ आणि त्यांचा मुलगा श्रेयस हे मात्र वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने त्या भागात शोधकार्य सुरु केलं. तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे या ठिकाणी भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला. वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा रात्री उशीरापर्यत शोध सुरु होता. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा हे शोधकार्य सुरु करण्यात आले. यानंतर संबंधित महिलेचा मृतदेह सापडला मात्र मुलचा अजूनही शोध लागलेला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३९ टक्के पाऊस
हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले असून दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत आहे. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात १३.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मान्सून कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी ३९.८२ टक्के पाऊस झाला आहे.