लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडूनहिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनी जोडणीचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीज जोडणीचे कामे केली जाणार होती. पूर्व नियोजन म्हणून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली. भूमिगत वाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये अपेक्षित खर्चही ठरविण्यात आला. प्रत्यक्षात मात्र अद्याप कामास प्रारंभ झाला नाही.हिंगोली शहर सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून व गर्दीच्या ठिकाणी वीजतारा उघड्या राहू नयेत, यासाठी हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे येत्या पंधरा दिवसांत काम सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून दोन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. कामासाठी लागणारी परवानगी, सर्वेक्षणही झाले होते. महावितरण व नगरपालिकेकडून भूमिगत वीजवाहिनीच्या कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. शिवाय या कामासाठी लागणारा निधीची तरतूदही करण्यात आली. परंतु भूमिगत वीज वाहिनीच्या कामास मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे नियोजन पूर्ण होऊनही ही कामे का केली जात नाहीत, याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंगोली शहरातील इंदिरा गांधीचौक, गांधीचौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इत्यादी चौकात महातिवरणच्या विद्युत तारांचा गुंता मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय वीज तारांचे घर्षण होऊन वारंवार बाजारपेठेतील वीज बंद होते. पावसाळ्यात तर वीज तारांच्या गुंत्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हिंगोली शहरातील वर्दळीच्या ठिकाणी भूमिगत वीज वाहिनीची कामे महावितरणने हाती घेण्याचे ठरविले होते. तत्कालीन उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी जून महिन्यात सांगितले होते की, सदर भूमिगत वीज वाहिनीची कामे येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. परंतु पिसे यांची परभणी येथे बदली झाली. त्यानंतर मात्र हिंगोली शहरातील भूमिगत वीज जोडणीच्या कामांना ‘खो’ बसल्याचे चित्र आहे.हिंगोली: थकबाकी वसुलीसाठी फिरते पथकहिंगोली शहरात मागील पंधरा दिवसांपासून महावितरणकडून थकबाकी वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. ज्या वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे, त्यांची थेट वीज तोडण्यात येत आहे. ग्राहकांना थेट वीजबिल भरणा करता यावा यासाठी महावितरणचे थकबाकी वसुली फिरते पथक घरो-घरी जाऊन बिल भरून घेत आहे.परंतु ज्या थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडण्यात आली, व ग्राहकाने वीजबिल भरणा केला असेल त्यांची तात्काळ संबधित वीज कर्मचाºयाने जोडणी करणे आवश्यक आहे. परंतु वीज जोडणी वेळेत करून दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहेवीज जोडणीची रीतसर पावती फाडूनही महावितरणच्या चकरा माराव्या लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत.
भूमिगत ‘वीज’ची कामे थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:18 AM