औंढा नागनाथ (हिंगोली): येथील तलावात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून स्वतः मच्छीमाराचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. विठ्ठल लक्ष्मण सुरदुसे ( ४९, भोई गल्ली, औंढा नागनाथ ) असे मृताचे नाव आहे.
पन्नास एकरवर असलेल्या नागनाथ तलावात अनेक वर्षांपासून मत्स्य व्यवसाय केला जातो. आज सकाळी ६ वाजता विठ्ठल लक्ष्मण सुरदुसे यांनी पूर्ण तलावात मास्यांसाठी जाळे टाकले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुरदुसे तलावावर परत आले. जाळ्याला मस्त्य लागला की नाही हे पाहण्यासाठी ते तलावात उतरले. मात्र, अंदाज न आल्याने ते जाळ्यात अडकले. प्रयत्न करूनही सुरदुसे यांना जाळ्यातून बाहेर पडता न आल्याने बुडून मृत्यू झाला.
काही वेळाने सहकारी तलावावर आल्यानंतर त्यांना सुरदुसे यांचा जाळ्यात अडलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे धक्कादायक चित्र दिसले. त्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांनी दिली. यावरून पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे पोलीस, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, फौजदार अफसर पठाण, अनिल लांडगे, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, राजकुमार सुर्वे, गणेश गायकवाड, सुदाम आडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मृताच्या पश्चात आई, भाऊ-बहिण, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.