औंढा नागनाथ (हिंगोली ) : एका ऊसतोड मजुराचा ट्रॅक्टरमधून खालीपडून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना हिंगोली औंढा रोडवरील देवाळा पाटीजवळ आज सकाळी ७ वाजता घडली. गोरख गोबरा राठोड (४८) असे मृत मजुराचे नाव असून तो पुसद तालुक्यातील रहिवासी होता.
याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुसद तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील उसतोड मजूर गोरख गोबरा राठोड (४८) हे आपल्या कुटुंबासह व गावातील इतर ऊसतोड मजूरांसह बार्शी येथील साखर कारखान्यावर ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच. १३ सी.एस. ४८२९) मध्ये बसून जात होते. दरम्यान, आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चालकाने औंढा नागनाथ जवळ देवाळापाटीवर ट्रक्टर थांबवीले. गोरख राठोड लघुशंकेसाठी खाली उतरले, ट्रॉलीत बसत असताना राठोड यांना चालकाच्या हलगर्जीपणामुळे धक्का लागून खाली पडले व ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सध्या मजूराच्या हाताला काम नसल्याने अनेक मजूर कुटूंबे मजुरीच्या शोधात कुटूंबासह बि-हाड पाठीवर घेऊन परजिल्ह्यात जात आहेत. तसेच हे कुटूंब उसतोडणी करण्यासाठी टोळीसह बि-हाड घेऊन सोलापूर जिल्ह्यात निघाले होते; परंतु काळाने या मजूर कुटूंबावर घाला घालून घरचा कर्ता पुरूष हिरावून घेतला. त्यामुळे हे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताचा मुलगा बजरंग गोरख राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया औंढा पोलीस ठाण्यात चालू होती.