पोलीस गस्तीची गरज
हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफिस रोड ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही टवाळखोर आपल्या वाहनांचा मोठा आवाज करीत नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर अनेक रुग्णालय असून या प्रकाराचा त्रास रुग्णांना होत आहे. वारंवार या टवाळखोरांना नागरिकांनी समज दिल्यानंतरही त्यांचा प्रकार कमी होत नाही. यामुळे रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास या रस्त्यावर पोलिसांची गस्ती रहावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मास्कचा वापर वाढला
हिंगोली : मागील चार दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर मास्कचा वापर करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत नागरिकांत कोरोनाची भीती कमी झाली होती. यामुळे अनेक नागरिकांनी मास्कचा वापर करण्यास टाळाटाळ केली, पण चार दिवसांपासून हिंगोली शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असल्याचे पाहत नागरिकांनी मास्कचा वापर करणे पुन्हा सुरू केले आहे.
दुष्काळी अनुदान व पीकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
सेनगाव : तालुक्यातील अनेक शेतकरी दुष्काळी अनुदान व पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. आपला पीकविमा मंजूर झाला का, हे पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकरी बँकेत जावून आपले बँकखाते तपासत असल्याचे दिसत आहे. वारंवार मागणी करूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा व दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. यामुळे पुढील शेतीकामांसाठी पैसे कोठून आणावे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मजुरांचे स्थलांतर वाढले
औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गतचे काम बंद असल्यामुळे अनेक मजूर वर्ग कामाच्या शोधात भटकंती करीत आहे. तालुक्यात काम मिळत नसल्यामुळे बरेच मजूर आपल्या कुटुंबांसह परगावी कामाच्या शोधात जात आहेत. शहरातील राज्यमहामार्गावर अनेक मजुरांचा ताफा ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी आदी वाहनांतून औरंगाबाद, मुंबई, पनवेल, कल्याण, ठाणे, सुरत, इंदौर व इतर मोठ्या शहरांच्या ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
हिंगोली : शहरातील जुन्या शासकीय रुग्णालय परिसरात कचऱ्याचा मोठा ढिगारा जमा झाला आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी कचरा जमा झाल्यामुळे दुर्गंधी परिसरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून हा कचरा साफ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यासाठी न.प. विभागाने याकडे लक्ष घालून हा कचरा साफ करेल, अशी आशा या नागरिकांना लागली आहे.