हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान अवकाळी पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कामे आटोपती घ्यावी लागली. ३ जून रोजी मध्यरात्री व ४ जून रोजी दुपारी अवकाळी पावसाने जिल्हाभर वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. ४ जून रोजी डोंगरकडा, औंढा नागनाथ, शिरडशहापूर, केंद्रा (बु,) कळमनुरी, वसमत, वरुड, वाकोडी, कुरुंदा, जवळाबाजार, आखाडा बाळापूर आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सुदैवाने जीवितहानी टळली...जवळाबाजार (जि.हिंगोली) औंढा तालुक्यातील जवळाबाजार येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात एक वाहन उभे होते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जोराचे वादळी वारे सुटले आणि झाड वाहनावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वादळामुळे सोलार प्लेट उडाल्या...कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी वसंत नागोराव गुंडले यांच्या शेतात रविवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान झालेल्या वादळात सोलार सेट उडून गेल्या. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे