लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या शब्दाचा मानच ठेवला नाही तर सार्थही ठरविला आहे.गोरेगावला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांची होतीे. ती महाजनादेश यात्रेत आ.मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. नवीन तालुका निर्मितीची प्रक्रिया जेव्हा होईल तेव्हा तेथे केवळ फलक बदलायचे काम बाकी ठेवू. तोपर्यंत अतिरिक्त तहसील देण्याची घोषणाच केली होती. हा निवडणूक फंडाच असल्याचे आधी वाटत होते. मात्र नंतर त्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला. विशेष म्हणजे तो एवढ्या कमी कालावधीत मंजूरही झाला. या अप्पर तहसील कार्यालयासाठी तूर्त अप्पर तहसीलदारासह लिपिक अशी दोन पूर्णवेळ पदे मंजूर करण्यात आली आहेत. गोरेगावअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव व आजेगाव या दोन मंडळातील एकूण ३५ गावांचा अतिरिक्त तालुक्यात समावेश केला आहे. यात गोरेगाव मंडळांतर्गत १५ गावे व आजेगाव मंडळांतर्गत वीस गावांचा समावेश आहे. सदर अतिरिक्त तालुक्यामध्ये तलाठी सज्जा निर्माण करून त्या अंतर्गत येणाºया गावांच्या समावेशाचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, असे आदेशित केले होते. याची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २0 रोजी गोरेगाव मंडळाअंतर्गत ६ व आजेगाव मंडळाअंतर्गत ६ तलाठी सज्जे निर्मितीचे नियोजन केल्याचे आदेश पारित केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. दरम्यान, उपसचिव यांचे आदेश प्राप्त होताच गोरेगावसह ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.गोरेगाव या ठिकाणी अतिरिक्त तहसीलदार म्हणून औंढा तहसीलमधील व्ही.यू. भालेराव यांची तर लिपिक म्हणून सेनगाव तहसीलमधील बबन व्यवहारे यांची प्रतिनियुक्ती करण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी काढला आहे. त्यामुळे लवकरच नवीन अतिरिक्त तहसील कार्यालयाचे कामही सुरू होणार असल्याचे दिसते.
गोरेगावचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:01 AM