हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शिवनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात अवघड असलेली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशातून ३९५ वा रँक मिळवत हे यश संपादन केले आहे.
डॉ. अंकेत केशवराव जाधव असे यशस्वी उमेदवाराचे नाव आहे. शेतकरी पुत्र असलेल्या अंकेत जाधव यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कळमनुरी येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात तर उच्च माध्यमिकचे शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वैद्यकीय सेवेत दाखल झाले. याच वेळी त्यांना प्रशासकीय सेवा खुणावत होती.
हिंगोली जिल्ह्यातच वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. वैद्यकीय सेवा बजावत असतानाही त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता. अभ्यासातील सातत्य, योग्य नियोजन व कठोर मेहनत यांच्या बळावर त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशातून ३९५ वा रँक मिळवित यश मिळविले आहे. यशामध्ये आई वडीलांचा मोठा वाटा आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.