लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आधीच कोणी अधिकारी यायला तयार नसताना येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नवीन अधिकारी देण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्तही केले जात असल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत चालला आहे.जि.प.त वर्ग-१ व २ ची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यातच विभागप्रमुखांचे एकेक पद रिकामे होत आहे. पहिल्यांदाच दोन्ही शिक्षण विभागाला प्रमुख आहे. तर पाणीपुरवठा, लघुसिंचन, आरोग्य, समाजकल्याण, यांत्रिकी, भूवैज्ञानिक, सामान्य प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण या विभागांचा कारभार प्रभारीवर चालू आहे. काही विभाग वर्षानुवर्षांपासून प्रभारीवर चालत आहेत. वर्ग २ ची तर शेकडो पदे रिक्त आहेत. त्यावर काही होणार नसल्याचे एवढ्या वर्षांच्या परंपरेमुळे दिसतच आहे. मात्र निदान विभागप्रमुख तरी असणे गरजेचे असताना तेही दिले जात नसल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाचीही हीच गत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी व हिंगोली उपविभागीय अधिकारी हे पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहे. ही दोन्ही पदे भरण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. जिल्हा मुख्यालयाचे हे हाल दूर करणे लोकप्रतिनिधींना शक्य होत नाही. पालकमंत्री, आमदार, खासदार जि.प.त हस्तक्षेप करीत असल्याचा वारंवार आरोप होतो. मग ही पदे भरण्यासाठी त्यांना हस्तक्षेप का करावा वाटत नाही, असा सवाल सदस्यांतून विचारला जात आहे.
रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:31 AM