हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लस आली होती. कोविशिल्ड काही दिवसातच येणार असल्याचे केंद्राच्या ठिकाणावरून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ३३ केंद्रावर लस देण्याचे सुरु होते. परंतु, लस अचानक संपल्यामुळे नागरिकांना तीन दिवस लस घेण्यासाठी थांबावे लागले होते. आतापर्यंत कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे १२ हजार ९२० डोस देण्यात आलेले आहेत. लसीचा साठा संपल्यामुळे शहरातील कल्याण मंडपम येथील केंद्र बंद पडले होते. लस संपल्याचे फलक ही तेथे लावण्यात आला होता. संचारबंदीत ही काही नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन जात होते. पण फलकावरून सूचना वाचून निराश होऊन परत जाताना पहायला मिळाले.
१७ व १८ एप्रिल रोजी काही नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात विचारणा केली. तेव्हा त्यांना १९ एप्रिल रोजी लस येणार असे सांगितले गेले. पण सोमवारी ही लस आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची विनाकारण चक्कर झाली. खासगी दवाखान्यात तरी लस मिळेल या आशेने काहींनी विचारणा केली. पण तिथेही लस नाही, असे सांगितले.
लसीकरण केंद्र बदलल्याचे माहितीच नाही
अँटीजन, आरटीपीसीआर आणि लसीकरण हे सुरूवातीपासूनच एकाच छताखाली सुरू होते. ‘लसीकरण आणि कोरोना तपासणी एकाच छताखाली ’ अशी बातमी ‘लोकमत’ मध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची जागा बदलली. परंतु अजूनही शहरातील नागरिकांना त्याची माहिती नाही. आजही काही नागरिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील डीईआयसी विभागाकडे जात आहेत. नंतर कल्याण मंडपम येथे येत आहेत.
लसीकरण केंद्रावर पाण्याची सोय नाही
पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. हे माहिती असूनही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने साधी पाण्याची सोयही केली नाही. काही नागरिक पिण्याची विचारणा करीत आहेत. यानंतर येथील कर्मचारी पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हणून वेळ निभावून नेत आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही हे पाहून काहींजण घरूनच पाणी घेऊन येत आहेत.