हिंगोली : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या परिसरात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली २४ व २५ सप्टेंबर, असे दोन दिवस लसीकरण चालणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची श्यक्यता विचारात घेता पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार २४ व २५ सप्टेंबर रोजी, असे दोन दिवस हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या परिसरात कोरोना लसीकरण मोहीम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी पोलीस दलातर्फे प्रत्येक तालुक्यातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी २४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करून घ्यावे व येताना सोबत आधार कार्ड आणावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी केले आहे.