फक्त तीन दिवस पुरेल एवढा साठा
सध्या जिल्हा प्रशासनाकडे फक्त तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. शहरातील केंद्र दोन दिवस बंद होते. ३१४० लस उपलब्ध झाल्यानंतर ते सुरू झाले. सध्याची गती पाहता हा साठा तीन दिवसांपेक्षा जास्त पुरणार नाही. लगेच आला तर केंद्र बंद ठेवायची गरज पडणार नाही.
४५ पेक्षा जास्त वयाचे ५ टक्केच लसीकरण
४५ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी वयाचे २.१५ लाख नागरिक आहेत. त्यांच्यापैकी ११ हजार ४६६ जणांनाच आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस दिली, तर १०७० जणांनी दुसरा डोस घेतला. हे प्रमाण ५ टक्केच असून, याचा वेग कधी वाढणार हा प्रश्न आहे.
२५ टक्के ज्येष्ठांचे लसीकरण
ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. त्यापैकी २३ हजार ६४५ जणांनी लसीकरण केले, तर १६७९ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. अजूनही ज्येष्ठच यात पुढे आहेत.
दिलेल्या वेळ मर्यादेनुसार दुसरा डोस
पहिला डोस घेतल्यानंतर त्याच लसीचा दुसरा डोस दीड महिन्यानंतर घ्यावयाचा आहे. पहिली लस घेतल्यानंतर एवढा काळ संपला की, दुसरी लस घेण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यानुसार त्यांना ही लस दिली जात आहे.
दुसरी लस घेणाऱ्यांमध्ये ३७९६ आरोग्य कर्मचारी, १३४४ फ्रंटलाइन वर्कर, १०७० जण ४५ वर्षांपुढील तर १६७९ ज्येष्ठांचा समावेश आहे. अनेकांनी लस घेण्यास विलंब केल्याने या महिन्याच्या शेवटी व पुढील महिन्यात दुसऱ्या डोसची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाला आता नियोजन करावे लागणार असून, अशांसाठी डोसही राखीव ठेवत नवीन लसीकरण करावे लागणार आहे; अन्यथा विलंबाचा फटकाही सोसावा लागू शकतो.
लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज
सध्या जिल्ह्यात ३० शासकीय व ३ खासगी केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. यात आता वाढ करणे गरजेचे आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील गट आल्यानंतर जेथे तीन खोल्या व इंटरनेटची व्यवस्था आहे, अशा प्रत्येक गावात लसीकरणास प्रारंभ करावा लागेल. सध्या काही उपकेंद्र स्तरावर मिळून ५५ केंद्रांचे नियोजन करून काम सुरू आहे. मात्र, यापेक्षा जास्त केंद्र स्थापन केल्याशिवाय लसीकरणाला गती येणार नाही.
१४,१२,४५० जिल्ह्याची लोकसंख्या
१८ ते ४५ वर्षांपर्यंतची लोकसंख्या ५,२६,१७१
स्त्री संख्या २,३८,०९७
पुरुष संख्या २,८८,०७४