हिंगोली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस घेण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. एकंदर सर्वच केंद्रांवर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मध्यंतरी म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यात दोन्ही लसींचे डोस संपले होते. त्यामुळे लसीकरण थांबले होते. आता महिनाभरापासून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज जिल्ह्यात ७ हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. त्यावेळेस ज्येष्ठ मंडळींनी उत्साह दाखविला होता. कोरोनाची तिसरी लाट घातक आणि त्रासदायक असल्याचे समोर ठेवून युवकही लसीकरणात उत्साह दाखवत आहेत.
आतापर्यंत १८ ते ४४ व त्या पुढील वयोगटातील ५९ हजार २४० नागरिकांनी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत. पहिला डोस घेणारे ५९ हजार २४० व दुसरा डोस घेणारे १ हजार ७२६ जण आहेत. आजमितीस जिल्ह्यात ७ हजार लस शिल्लक आहेत. जिल्ह्यासाठी आतापर्यंत २ लाख ५२ हजार ६० डोस प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार ५९१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात २४ प्राथमिक केंद्र आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. हिंगोली शहर व जिल्हा मिळून लसीकरणासाठी ३२ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत,
लसीकरण करून घेणे हिताचेच -
कोरोना महामारीचे संकट टाळायचे असेल तर शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोना महामारी ओसरत असली तरी निष्काळजीपणा करून चालणार नाही. नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी सतर्कता बाळगायला पाहिजे. सद्य:स्थितीत ७ हजार लस उपलब्ध आहेत. जिल्ह्यासाठी अजून लस मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. तेव्हा जिल्ह्यातील नागरिकांनी जसा वेळ मिळेल तसे लसीकरण करून घेणे हे त्यांच्यासाठी हिताचेच आहे.
- प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी