लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वकील असताना झालेली सोयरीक न्यायाधीशपदाची परीक्षा पास होताच मोडण्याचा प्रकार करणाºया वकिलाविरोधात वसमत येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणात अंतरिम जामिनासाठी वसमत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही वकील बंधूंना २० तारखेपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे.वसमत येथील अॅड. शेख फयाजोद्दीन व अॅड. शेख अयाजोद्दीन विरोधात हुंडा मागणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. अॅड. शेख फयाजोद्दीनची सोयरीक झालेली असताना व साखरपुडाही झालेला आहे.सदर वकील न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वधूपक्षाकडे १५ लाख हुंडा, २० तोळे सोने व इनोव्हा गाडीची मागणी करत सोयरीकच तोडून टाकली. या प्रकरणी वधूपित्याने पोलिसात तक्रार दिल्याने दोन्ही वकील बंधूविरोधात गुन्हा दाखल झाला होता.सदर प्रकरणात अटकपूर्व जमानतीसाठी वसमत न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. २० मार्चपर्यंत ही अंतरिम जमानत आहे. पाच अटींवर ही जमानत देण्यात आलेली आहे.दरम्यानच्या काळात प्रत्येक सोमवारी व बुधवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचीही अट अंतरिम जमानत मंजूर करताना न्यायालयाने लावली आहे. न्यायाधीशपदाची परीक्षा पास झाल्यानंतर प्रतिष्ठा वाढली म्हणून भरमसाठ हुंडा मागत सोयरीक तोडण्याचे प्रकरणाने प्रचंड खळबळ उडालेली आहे.
‘त्या’ वकिलास अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:34 AM