हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणारे ग्रामपंचायत सदस्यांचे पती व सासरे आहेत. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरुड चक्रपान येथील ग्रामसेवक अरुण बबनराव वाबळे हे नेहमी प्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत बसले होते. याच दरम्यान, येथील महिला ग्रा. पं. सदस्या रुख्मिनाबाई आदमाने यांचे पती विजय आदमाने व सासरे रामराव आदमाने तेथे आले. या दोन्ही बाप लेकांनी ग्रामसेवक वाबळे यांना, 'तुम्ही चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचे काय नियोजन केले, गावात आल्यानंतर व येण्या अगोदर मला फोन का करत नाहीत,विकास योजनेची माहिती मला वयक्तिक फोन करुन का देत नाहीत' असे म्हणत वाद घातला. त्यानंतर लाथा बुक्क्याने मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
मारहाणीत वाबळे यांच्या पोटात मार लागल्याने ते खाली कोसळले. यावेळी कार्यालयातील उपस्थित जगन्नाथ चोपडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी ग्रामसेवकास वाबळे यांच्या फिर्यादीवरुन विजय आदमाने व रामराव आदमाने यांच्याविरुद्ध मारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शासकीय कामात अडथळा आणणे, कार्यालयीन कागदपत्रे फाडणे आदी यावरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि मधुकर कारेगावर करत आहेत.
ग्रामसेवक संघटना रस्त्यावर उतरणार ग्रामसेवक वाबळे यांना झालेल्या मारहाणीचा सेनगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. वाबळे यांना मारहाण करणार्या आरोपीना अटक होईपर्यंत ग्रामसेवक संघटना कामबंद आंदोलन करणार आहे. झालेली घटनाही निंदणीय असून, या प्रकाराने ग्रामसेवकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनामुळे गावातील विकास कामाना तर खिळ बसेलच त्याच बरोबर ग्रामसेवकांना सार्वजनिक दृष्ट्या कोणतीच कामे करता येणार नाहीत असे ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गोरडे यांनी सांगितले.