वसमत (हिंगोली ) : येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांसाठी बेंच नसल्याने पालकांनी येथे गोंधळ घातला. पालकांनी केंद्र संचालक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे व्यवस्था करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषद शाळेत दहावी व बारावी चे परीक्षा केंद्र आहे. मात्र परीक्षेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बेंचची व्यवस्था नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर पालकांनी केंद्र संचालकाकडे तशी मागणी केली. संबंधित शाळांनी मागणी करुनसुद्धा बेंच उपलब्ध करून दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकांनी गट शिक्षणाधिकारी नवनाथ थोरात यांना संपर्क केला असता संबंधित शाळेला पत्र पाठवले असल्याची त्यांनी माहिती दिली. यावर संतप्त झालेल्या पालकांनी पाल्यास पेपर लिहिताना अडचण येत आहे, त्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. पालक आक्रमक झाल्याने थोरात यांनी पुढील पेपरला बेंच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.