हिंगोली : जिल्ह्यात यावर्षी पाण्याची मुबलकता असल्यामुळे पालेभाज्या स्वस्त मिळत असल्या तरी तेलाचे दर मात्र उतरता उतरेना झाले आहेत. तेलाचे दर उतरणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे विहिरी व तलावांना पाणीही मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात निघत आहे. भाजी उत्पादकांना भाव योग्य मिळत नसला तरी ग्राहक मात्र भाज्या स्वस्त दरात मिळत असल्यामुळे आनंदी आहेत. शहरातील मंडईत गवार शेंगा २० रुपये किलो, वाटाणा शेंगा २५ रुपये किलो, वांगे ३० रुपये किलो, टोमॅटो ५ रुपये किलो, कोथिंबीर ५ रुपये जुडी, मेथी ५ रुपये जुडी अशाप्रमाणे पालेभाज्याची विक्री होत आहे. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ५ रुपये किलोप्रमाणे ते विक्री होत आहे. फळांची आवकही गत आठवड्यापासून कमीच आहे. त्यामुळे फळाचे भाव वाढलेले पहायला मिळत आहेत. फळांची आवक वाढल्यास फळेही पालेभाज्यांचीसारखी ग्रहकांना मिळू शकतील, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारपेठेत किराणा स्वस्त
जानेवारी महिना अर्ध्यावर आला तरी तेलाचे भाव उतरेना झाले आहेत. शहरातील बाजारपेठेत तीळ १२५ रुपये किलो, शेंगदाणा १०० रुपये किलो, साखर ३६ रुपये किलो, गूळ ४० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती किराणा विक्रेते नितीन शाहू यांनी दिली.
मकरसंक्रांतीनंतर भाज्यांचे भाव वाढतील असे वाटले होते; परंतु जिल्ह्यात पाण्याची मुबलकता असल्यामुळे पालेभाज्या वाढलेल्या नाहीत. यापुढेही भाज्या स्वस्तच राहतील.
-राहुल भिसे, भाजी विक्रेता, खरबी.
मकरसंक्रांत सणाला भाज्या वाढतील, अशी शक्यता होती, पण मकरसंक्रांत संपली तरी पालेभाज्यांचे भाव वाढलेले नाहीत. पालेभाज्या स्वस्त मिळत असल्यामुळे आनंद वाटत आहे.
-अमृता किर्तीवार, हिंगोली
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळांची आवक थोडी वाढली होती. अजून तरी फळांची आवक वाढलेली नाही. सद्य:स्थितीत नारळ पाणी मात्र महाग आहे.
-शेख इब्राहिम, फळ विक्रेता, हिंगोली.