हिंगोली: ३२ व्या रस्ते सुरक्षा महिना २०२१ अंतर्गत १८ जानेवारीपासून हिंगोली जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली. सुरक्षा अभियानाची पूर्वतयारी म्हणून वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात १ ते १७ जानेवारीपर्यंत वाहन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणे, वाहन चालवताान सीटबेल्टचा वापर न करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भार क्षमतेपेक्षा अतिररिक्त माल वाहतूक करणे, वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई म्हणून अनुज्ञप्ती तसेच वाहन नोंदणी निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी वसंत कळंबरकर, जगदीश माने, शैलेश कोपुल्ला यांची या पथकामध्ये नियुक्ती करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जोशी यांनी सांगितले.