हिंगोली : येथे जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या ८ मीटरच्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
हिंगोली शहरात सध्या भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे गरजेची होती. मात्र काम संथपणे सुरू असून या भागात तर ८ मीटर खोल खोदकाम करावे लागत असल्याने जास्तच वेळ लागला. एवढ्या खोल खड्ड्यात कठीण मुरुम लागल्याने त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हिंगोली शहरातील खडकपुरा भागातील बालक शेख इब्राहिम शेख खिजर (१४) हा बालक पाण्यात हातपाय धुण्यासाठी उतरला होता. त्याचा तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला.
जवळपास असलेल्या मुलांना कोणीतरी पाण्यात पडल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी व कर्मचारीही तत्काळ धावून आले. पाण्यात बुडालेल्या बालकाचा शोध घेऊन त्यास बाहेर काढण्यात आले. मात्र बालक बेशुद्ध अवस्थेत होता. बालकास जवळच असलेल्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने मात्र शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. पाण्यात बुडालेल्या बालकास बाहेर काढण्यासाठी राजू हरिभाऊ सोनपावले व इतर काही युवकांनी मदत केली. घटनास्थळी हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते.
लोकमतने व्यक्त केला होता धोकाभूमिगत गटार योजनेची कामे लवकर करावीत याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. रिसाला भागातील चित्रही मांडले होते. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमिवर पालक व चिमुकल्यांची व्यथा मांडली होती. त्यानंतर हा खड्डा अर्ध्या भागात बुजला होता. उर्वरित तसाच ठेवला. त्यानंतर पावसाचे आगमन झाले. काम तसेच रखडले.याच खड्ड्यात आता पावसाचे पाणी साचले आहे. कामे लवकर झाली असती तर या खड्ड्यात पाणीच साचले नसते. बालक पाण्यात बुडाल्याची घटनाही घडली नसती, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.