- इलीयास शेख
कळमनुरी (जि. हिंगोली) : शहर व परिसरात ३१ ऑगस्टच्या रात्री नऊ वाजेपासून विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असून कळमनुरी ते शेंबाळपिंपरी हा रस्ता बंद झाला आहे. या मार्गावरील वाहतूकही बंद झाली असून मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या कयाधू नदीलाही पूर आला आहे. कळमनुरी शहरातून जाणाऱ्या बुडखी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे कोणीही घरातून बाहेर पडत नाही. शिवाय बाजारपेठेतही शुकशुकाट पहायला मिळत आहे. तालुक्यात मागील १८ ते २० तासांपासून ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे. शेतात पाणीच पाणी झाले आहे. खरीपातील पिके पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोयाबीन, मूग व उडीद या पिकांना शेंगा आल्या आहेत. परंतु पावसामुळे सदर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहर व ग्रामीण भागात ज्यांची घरे नदी व ओढ्याजवळ आहेत अशा नागरिकांना अतिवृष्टीची चिंता लागली आहे. तालुका प्रशासनाने सर्व तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी दिली.
इसापूर धरणात पाण्याची आवक वाढलीकळमनुरी-इसापूर धरण व पाणलोटक्षेत्र परिसरात ३१ ऑगस्टच्या रात्री नऊ वाजेपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. सध्या इसापूर धरणात ७२.६७ टक्के जलसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३८.३४ मिटर आहे. धरणात एकूण पाणीसाठा १०१५.५५३२ दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा ७००.५८९५ दलघमी आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून पाणी आवक ५३.८११३ दलघमी एवढी आहे. इसापूर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण प्रशासनाने सांडव्याद्वारे पाणी सोडण्याची तयारीही दर्शविली आहे.
कळमनुरी तालुक्यातही मार्ग बंद झालाशनिवारी मध्यरात्रीपासून जोदार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील सांडस नजकीच्या ओढ्याला पूर आला. त्यामुळे सांडस, सालेगाव, चाफनाथ हा मार्गही बंद झाला आहे. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे शेंबाळपिंपरी ते कळमनुरी हा मार्ग बंद झाला आहे.