हिंगोली : हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याविरोधात बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल केल्याने एकावर हिंगोली शहर पोलिसांत ३० जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास गुन्हा दाखल झाला.
हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याविरोधात त्यांच्या मित्रपक्षातीलच काहींनी वातावरण तापवले. मुटकुळे यांच्याविरोधात अचानकच अनेकांनी एकाच वेळी सोशल मिडियात पोस्ट टाकल्या. या पोस्ट आक्षेपार्ह असल्याने याची एकच चर्चा झाली. आमदारावर वैयक्तिक स्वरुपाची टीका करणाऱ्या या पोस्ट होत्या. याबाबत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू ऊर्फ असराजी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनू जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मित्रपक्षातील वाद ताणला जातोयभाजपचा मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रमुख मित्रपक्षाशीच वाद ताणला जात आहे. भाजपपेक्षा मित्रपक्ष वरचढ असल्याने भाजपच्या मंडळीला बॅकफूटवर खेळावे लागत होते. त्यात भाजपची जास्तच गोची होत असल्याने आ.तान्हाजी मुटकुळे अखेर फ्रंटफूटवर आले होते. त्यामुळे त्यांना नामोहरम करण्यासाठी लागलीच ही खेळी खेळली गेली. मुटकुळेंविरोधात सोशल मीडिया पोस्टची बरसात झाली. आगामी काळात मुटकुळे याला कसे उत्तर देतात, हे पाहणे अधिक रंजक ठरणार आहे.