शिरडशहापूर (हिंगोली ) : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत आज भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी आलेल्या हजारो भाविकांसाठी १५० क्विंटल भाजीचा महाप्रसाद बनविण्यात आला होता.
शिरडशहापूर येथे वीरशैव बांधवाचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वर्षांपासून दरवर्षी मकरसंक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या यात्रेत भाजीच्या महाप्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत येणारे भाविक सोबत पोळ्या घेऊन येतात. येथे तयार केलेला भाजीचा प्रसाद घेऊन भोजन करतात. तसेच भाजीचा प्रसाद घरी देखील घेऊन जातात.
महाप्रसादासाठी परिसरातील भाविक गाडी बैलाने तर कोणी डोक्यावर शेतातील भाजीपाला घेऊन येतात. यात टोमॅटो, वांगी, चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी, करडी, पानकोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर, काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १५० क्विंटल भाज्याचा यात समावेश असतो. या सर्व भाज्या मोठ्या कढईत एकत्र करून त्याचा महाप्रसाद तयार करण्यात येतो. यानंतर या प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात येते. यात्रेसाठी संपूर्ण जिल्हा व जिल्हा बाहेरील हजारो भाविक येतात. महाप्रसादासाठी शिरडशहापुर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
पहा व्हिडिओ :