हिंगोली: खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे फेटेधारी दहा हजार समर्थक सामील होताच यात्रेचे चित्रच पालटलं. याचवेळी थोडावेळ काढून राहुल गांधी थेट आखाड्यात पोहचले. येथे कोल्हापूरच्या पहेलवानांची दंगल पाहत खा. राहुल यांनी कुस्तीचे डावपेच जाणून घेतले.
भारत जोडो यात्रेत देशभरातील नागरिक आपला सहभाग नोंदवत आहेत. राज्यात नांदेड येथून दाखल झालेली यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातून कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते यात्रेत दाखल होत आहेत. कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे दहा हजारांवर समर्थक पहाटे आखाडा बाळापूर येथे दाखल झाले. या सर्वांनी कोल्हापुरी फेटा बांधून सहभाग घेतल्याने यात्रेचे चित्रच पालटले. यावेळी लेझिमचा खेळही होता. मराठमोळ्या पद्धतीने राहल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रमुख खेळ असलेली मातीतील कुस्ती खा. राहुल गांधी यांच्यासमोर प्रदर्शित व्हावी, अशी आमची इच्छा होती. ती राहुल गांधी यांनी पूर्ण केली. त्यांनी ही कुस्ती पाहिली. त्यात मॅटवरील कुस्ती व मातीतील कुस्तीतील फरक काय? या मल्लांचे वजन किती, नियमवली काय आदी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. त्यांना या खेळाबद्दलचे कुतुहल पाहून आम्हाला आनंद झाला, अशा भावना यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिली.
भारत जोडो यात्रेत १० हजारांवर कोल्हापुरी फेटेधारी सामीलभारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो , भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती. खा. राहुल गांधी साडे सहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत सकाळच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा यांची भली मोठी रांग पहायला मिळाली. तर आमच ठरलय असे बॅनर्सही त्यांच्या हातात झळकत होते. बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले.