- यशवंत परांडकर
हिंगोली : थकबाकीपोटी ज्यांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद केला आहे. राज्यात ३२ लाख ७९ हजार ८३८ लघुदाब वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. याशिवाय उच्चदाब २४०४ ग्राहकांचा त्यात समावेश आहे. या लघुदाब व उच्चदाब या दोन वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘विलासराव देशमुख अभय योजना’ संजीवनी ठरणार आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत व त्यांना पुन्हा वीज जोडणी देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. या योजनेमुळे राज्यातील ३२ लाख ७९ हजार ८३८ लघुदाब वीज ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. या वीज ग्राहकांकडे ५ हजार ४२२ कोटी रुपये वीज थकबाकी आहे. याशिवाय राज्यामध्ये २ हजार ४०४ उच्चदाब वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून या ग्राहकांकडे एकूण १००१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा जर ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी खंडित झालेला असेल तर त्या सर्व ग्राहकांना स्वत:कडील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ सुरू केली आहे. ही योजना १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीतच राबविण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या वीज ग्राहकांकडील विलंब आकारणी शुल्क आणि व्याजाची रक्कम पूर्णत: माफ केली जाणार आहे. ग्राहकांनी वीज थकबाकी रक्कम संपूर्ण भरणे त्यासाठी आवश्यक आहे. वीज ग्राहकास थकबाकी रक्कम भरण्याकरिता व्याजरहीत सहा मासिक हप्ते मिळू शकतील. जर मूळ वीज थकबाकी रक्कम एकरकमी भरली तर लघुदाब वीज ग्राहकांना त्या रकमेत दहा टक्के आणि उच्चदाब वीज ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. कोरोना काळात झालेलेल्या अनेक लॉकडाऊनमुळे राज्यातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वीज ग्राहक थकबाकी भरू न शकल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे.
ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, त्या सर्व लघुदाब, उच्चदाब, वाणिज्य, औद्योगिक वीज ग्राहकांनी विलासराव देशमुख अभय योजनेत सहभागी होऊन स्वत:कडील थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा; पण या योजनेत सहभागी होण्यासाठी बेबाकी असणे तितकेच महत्त्वाचे आहे.- रजनी देशमुख, प्रभारी अधीक्षक अभियंता, हिंगोली