सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील ताकतोडा व हाताळा येथील गावकऱ्यांनी सुरू केलेले गाव विक्री आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रशासनाला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आंदोलकांनी आठ दिवसांचा कालावधी दिला आहे.
ताकतोडा येथील ग्रामस्थांनी पिक विमा, सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करा या प्रमुख मागण्यांसाठी २४ जुलैपासून गाव विक्री आंदोलन पुकारले होते. ग्रामस्थांनी शाळा बंदी करीत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून ती मंदिरात भरविली. ग्रा.प.कार्यालय कुलपबंद ठेवले. त्यानंतर १४ युवक शेतकऱ्यांनी बुमुदत उपोषण केले. शिवाय गावातील काही ग्रामस्थांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. २६ जुलै रोजी ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग केला.
अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवनकुमार कांबळे, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर आदींनी ताकतोडा येथे जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली व आठ दिवसांत दीड लाख रुपये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल. शिवाय या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यासाठी गावात बँकेच्या माध्यमातून मेळावा घेऊन नवीन पीककर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले. सरसकट कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी कालावधी लागणार असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केली. त्यानंतर आठ दिवसांची मुदत देऊन हे आंदोलन सायंकाळी चार वाजता मागे घेण्यात आले.
हे सरकार आहे की कुंभकर्ण?हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी आंदोलनाची दखल घ्यायला भाजप-शिवसेनेच्या सरकारला आठ-आठ दिवस का लागतात? हे सरकार आहे की कुंभकर्ण? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.