- विजय पाटील
हिंगोली : गाव विकायला काढलेल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडावासीयांनी २३ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुलांना शाळेत न पाठविता मंदिरावरच वर्ग भरविले जाणार आहेत.
ताकतोडा हे साडेतीन हजार लोकसंख्येचे सधन गाव. मागील काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाने हे गाव आर्थिक कोंडीत सापडले. कर्जमाफी झाली मात्र बँक त्याची माहिती देत नाही. जे शेतकरी दीड लाखाच्या आतले आहेत त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्यांनाच त्याची माहिती मिळाली. त्यांनाही काहीतरी रक्कम भरावी लागली तेव्हा कुठे खाते बेबाकी झाले. त्यानंतर नवीन कर्ज बँकेने नाकारले. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना आता कुठे माहिती दिली जात आहे. प्रशासनाने कर्जमाफीची यादी गावात आणून वाचण्याची तसदी अद्याप घेतलेली नाही. सिंधूबाई सावके या महिला शेतकऱ्यास १.२१ लाखाची कर्जमाफी झाली आणि १.६३ लाख भरण्याची नोटीस दिली. दीड लाखाची कर्जमाफी आहे तर २९ हजार कुठे गेले, असा सवाल त्यांचा मुलगा विठ्ठल सावके यांनी केला. कळीचा मुद्दा आहे तो पीकविम्याचा. गतवर्षी दुष्काळ होता. साडेपाचशेवर शेतकऱ्यांना शासनाने दुष्काळी मदत दिली. मग पीकविमा कंपनीने विमा का दिला नाही, असा सवाल उमेश सावके यांनी केला. निदान आम्ही भरलेली रक्कम तरी परत करा, ही त्यांची मागणी.
फायनान्सच्या कर्जाखाली दबले गावप्रगतीच्या मार्गावर असतानाच दुष्काळाने अचानक ब्रेक लावला. राष्ट्रीयीकृत बँका दारात उभे करीत नव्हत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खाजगी फायनान्सचे कर्ज घेतले. काहींनी घर बांधकाम व इतर बाबींसाठी असे कर्ज काढले. अशांची संख्या इतकी मोठी आहे की, या गावाने फायनान्सचे कर्ज माफ करण्याची प्रमुख मागणी केली आहे.
गावातील बेरोजगार विद्यार्थी घेणार वर्गगावातील जि.प. शाळेत २५२ विद्यार्थी आहेत. सात शिक्षक आहेत. यापैकी एक शिक्षिका प्रसूती रजेवर आहे. शिक्षक ग्रामस्थांना रोज विनवणी करीत आहेत. मात्र पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत, असे त्यांचे म्हणने आहे. सरपंच प्रमोद सावके यांनीही ग्रामस्थांनी मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर काहीतरी व्यवस्था करावी, असे आवाहन केले. त्यामुळे गावातील बेरोजगार डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा अभ्यास घेऊ, मंदिरावर मुलांचे वर्ग भरविले जातील, असे ग्रामस्थांनी सांगितले.
हमीभाव नावालाचशासनाचे विविध पिकांचे हमीभाव आधीच कमी आहेत. त्यात हमीभावात माल खरेदी कराण्याची कोणतीच यंत्रणा नाही. शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाची प्रतवारी इतर भानगडी सांगून शासनच अडवते. तर व्यापारी मातीमोलच भाव देतात. दुष्काळात कमी पिकले अन् ते कमी भावातच विकले म्हणून गाव विकायला काढायची वेळ आल्याचे अशोक गोपाळराव टाले यांनी सांगितले. या गावात आज उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी भेट दिली. मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.
185 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी तहसीलचा अहवाल; दीड लाखावरील कर्ज भरले तरच १०१ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी ताकतोडा गावातील ३६७ पैकी २८६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असले तरी दीड लाखाच्या आत कर्ज असलेल्या १८५ शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा झाला. उर्वरित १०१ जणांना दीड लाखावरील पैसे भरले तरच कर्जमाफी मिळणार आहे. ही माहितीदेखील या शेतकऱ्यांना दिली गेली नव्हती. गाव विकण्याचा निर्णय घेतलेल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून आता ही माहिती दिली जात आहे. सेनगाव तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात कर्जमाफीमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया गोरेगाव शाखेत ३६७ पैकी २८६ खातेदार कर्जमाफीस पात्र ठरल्याचे म्हटले आहे. त्यांना २.४९ कोटींची कर्जमाफी देणे शक्य आहे. यापैकी १८५ जण दीड लाखांच्या आतील आहेत. त्यांना १.४७ कोटी माफ झाले. उर्वरित १0१ जणांना दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून घेण्यासाठी त्यापुढील रक्कम त्यांना बँकेत भरावी लागणार आहे.
ताकतोडा गाव ज्या कृषी मंडळात येते, त्या आजेगाव मंडळात ५0९३ शेतकऱ्यांनी उडीद, कापूस, मूग, सोयाबीन व खरीप ज्वार या पिकाचा विमा भरला होता. यापैकी खरीप ज्वारीसाठी २२ शेतकऱ्यांना १.४१ लाख मंजूर झाले. ते त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे अहवालात म्हटले आहे. ५७८ शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे ४३.७६ लाख मंजूर झाले. ५३ शेतकऱ्यांचे ३.१0 लाख खात्यावर जमा करणे बाकी आहेत. ते लवकरच जमा होतील, असेही त्यात म्हटले आहे.