लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे.हिंगोली जिल्ह्यात ग्रामसामाजिक परिवर्तन योजनेतून दहा गावांची निवड केलेली आहे. आधी केवळ सेनगाव तालुक्याचीच यात निवड केलेली होती. नंतर इतर तालुक्यांतही यातून कामे करण्यासाठी गावांची निवड करण्यात आली.सेनगाव तालुक्यातील गोंडाळा, खिल्लार, जामदया, लिंगदरी, जामठी, सूरजखेडा या गावांचा समावेश आहे. तर औंढा तालुक्यातील देवाळा तुर्क पिंपरी, सावळी बहिनोबा, हिंगोली तालुक्यातील जांभरुन तांडा, जांभरुण आंध या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांची लोकसंख्या ७३३४ असून यापैकी २३३९ जणांकडे जॉबकार्ड आहे. मागील तीन वर्षांत या गावांमध्ये ५६.९७ लाखांचा खर्च झाला आहे. यात सर्वाधिक खर्च झालेले गाव खिल्लार आहे.तेथे ११.३१ लाख खर्च झाला. तर जांभरुण आंधला १0.१५ लाखांचा खर्च झाला आहे.आता या सर्व गावांमध्ये १८२२ कामे करण्याचे नियोजन केले आहे. मजूर आहेत, कामे आहेत. मात्र त्यावर कोणी हजेरी लावत नसल्याने ही कामे नुसती नियोजनातच आहेत. या योजनेतील ही गावे असल्याने येथे वेगळेपण जपून कामे सुरू करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यात गोंडाळा १९४, खिल्लार-१४९, जामदया-१४९, लिंगदरी-१२२, जामठी ७१0, सूरजखेडा ७७, जांभरुण तांडा १९४ तर जांभरुण आंधला २३७ कामांचे नियोजन आहे. उर्वरित २ गावांतही ४३१ कामांचे नियोजन करण्यात आल्याचे औंढा तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेत योग्य नियोजन करून कामे करण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र आता निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने नियमित कामांचीच अंमलबजावणी नसल्याने या कामांना तर खो दिल्याचेच चित्र आहे.
ग्रामसामाजिक परिवर्तन मनरेगातच अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:18 AM