हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी त. लोहरा येथील रस्त्यावर काही जणांनी मिळुन अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे शाळकरी मुले व ग्रामस्थांना कठीण झाले असून संपूर्ण रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना २२ जुलै रोजी दिले आहे.
औंढा तालुक्यातील पिंपळदरी त. लोहरा येथील शासकीय रस्त्यावर शेतशिवारातीलच चौघा जणांनी मिळुन अतिक्रमण केले आहे. व रस्ता नदीतून काढून दिला. तहसीलदार यांनी कागदोपत्री रस्ता खुला करून दिला असला तरी प्रत्येक्षात मात्र अतिक्रमण हटलेच नाही. याबाबत संबधितांना विचाराणा केली असता धमक्या दिल्या जात आहेत असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. रस्ता पुर्णपणे मोकळा करून द्यावा अशी मागील दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी वारंवार निवेदन दिली, शिवाय उपोषणही केले परंतु अद्याप रस्ता मोकळा झाला नाही. प्रशासनाने ठोस भुमिका घेऊन या विषयावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे येथील आनंदराव इंगोले यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. निवेदनावर शेषेराव ठोंबरे, गणेश ठोंबरे, मोहन ठोंबरे, कोंडबा फोपसे, बबन ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.