सेनगाव :तालुक्यातील तळणी येथे दोन महिन्या पूर्वी वयोवृद्ध महिलेचा शेतात खुन झाला होता.या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नसून मारेकरी मोकाट आहेत .याच्या निषेधार्थ गुरुवारी ( दि. ५ ) तळणी येथील ग्रामस्थांनी रिसोड-हिगोली महार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
तळणी येथील मथुराबाई पांडुरंग कोरडे (६७) या महिलेचा दि.५ जानेवारी ला शेतात गळा आवळून खुन करण्यात आला होता. अज्ञात आरोपींने सदर वयोवृद्ध महिलेचा अंगावर असलेले ८२ हजार रुपये किमतीचे दागिने हि चोरून नेले होते.या घटनेला जवळपास दोन महिने पूर्ण झाले परंतु, नर्सि पोलीस ठाण्याला या खुनाचा अद्याप उलगडा करता आला नाही. पोलीस यंत्रणा पुरती अपयशी ठरत असल्याने याच्या निषेधार्थ तळणी ग्रामस्थांनी गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आरोपींच्या अटकेची मागणी करत रिसोड -हिगोली या राष्ट्रीय महामार्गावर तळणी फाटा येथे ग्रामस्थांनी सकाळी १० ते १ दरम्यान चार तास रास्तारोको करत वाहने अडवून धरली. उपविभागीय पोलीस अधिकारी ऐ.बी.खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी भेट घेऊन दहा दिवसांत तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात सरपंच महादु खंदारे,जनार्धन कोरडे,माणिक कोरडे,भाऊराव कोरडे,नामदेव कोरडे,विश्ववनाथ कोरडे,गोपाल कोरडे,दशरथ कोरडे,राजाराम कोरडे,सोमगीर गिरी,बाबाराव खंदारे,रामेश्वर कोरडे,गणपत कोरडे राजाराम खनपटे यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ सहभागी होते.