- इब्राहीम जहागीरदारकुरुंदा (हिंगोली): वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री १ ते २ वाजे दरम्यान जवळपास ५ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये जवळपास साडेतीन लाख रुपयांचे ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना समजताच ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
पांगरा (शिंदे) येथे मध्यरात्री १ ते २ वाजेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी हातसफाई केल्याचे समोर आले. पांगरा शिंदे येथील अशोक शिंदे यांच्या घरी कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरट्यांनी चोरली. कुंडलिक शिंदे यांच्या घरातील हळदीचे ठेवलेली रक्कम लंपास केली. तसेच संजय शिंदे, श्याम शिंदे यांच्या घरी देखील चोरी झाली. तर गोविंद शिंदे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी या गावात धुमाकूळ घातला.
चोरट्यांनी साधली संधी...उन्हाळ्यात वातावरण तापल्याने रात्री ग्रामस्थ छतावर झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. घटनास्थळी कुरुंदा पोलिसाच्या पथकांनी भेट दिली आहे. चोरीच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे एकूण ऐवज चोरी गेल्याचे समजते. चोरीचा प्रकार समजताच मध्यरात्रीच् ३ वाजेपासून नागरिक जागरण करत बसले होते.