लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाच्या विविध टप्प्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक स्वरूपही मिळाले होते. याबाबत काही कार्यकर्त्यांवर घटनेशी संबंध नसतानाही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ २० आॅगस्ट रोजी पोलीस अधिक्षक यांची पुराव्यानिशी भेट घेवून दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करणार आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या महिनाभरात विविध आंदोलन छेडण्यात आले आहेत. येथील गांधी चौकात ३० जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. तसेच हे ठिय्या आंदोलन वसमत व सेनगाव येथेही करण्यात आले. दरम्यान, २४ जुलै रोजी बंददरम्यान हिंसक वळण लागले यामध्ये खानापूर पाटीजवळ पोलीस व्हॅनही पेटविण्याची घटना घडली होती. तसेच बाळापूर येथेहीआंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत. ९ आॅगस्ट महाराष्ट्र बंद दरम्यान सेनगाव येथील काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालकमंत्री कांबळे यांची भेट घेवून आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच मागणी केली. यावेळी पुरावे दिल्यास खोटे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले होते.
आज शिष्टमंडळ घेणार पोलीस अधीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:39 AM