आखाडा बाळापूर (जि. हिंगोली ): बोथी बऊर या भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे बोथी येथील एका राहत्या घराची भिंत कोसळली आहे. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठ्याने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा, बोथी, बऊर, काळ्याची वाडी, कांडली या भागांमध्ये ३ जुलै रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यापूर्वीही झालेल्या पावसामुळे परिसरात जलमय झाले होते. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे बोथी येथील दामाजी वामन सावळे त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सावळे यांच्या राहत्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाची माहिती तलाठी व तहसीलदार यांना देण्यात आली. त्यानंतर तलाठयांनी घराची पाहणी करून पडलेल्या भिंतीच्या व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत सदर घरमालकास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.