हिंगोली : केंद्रातील मोदी सरकारची संरक्षण व परराष्ट्र नीती अपयशी ठरली असून, एकाच वेळी देशाच्या चीन, नेपाळ आणि पाकिस्तानी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, हे त्याचे द्योतक आहे, अशी टीका खा़ राजीव सातव यांनी बुधवारी केली. देशाच्या सीमा असुरक्षित असून परकीय सत्ता डोके वर काढत आहे़ मंगळवारी कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह वीस जवान शहीद झाले असताना केंद्र सरकार कमालीची गोपनीयता पाळत आहे़ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता तरी, मन की बातऐवजी काम की बात करावी, असेही सातव म्हणाले.
देशाचे सर्व शेजारी भारताच्या विरोधात जाहीर टीका करीत आहेत़ भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या नेपाळच्या संसदेने भारताचा भूभाग आपला असल्याचे दाखवले़ आपल्या सैनिकांनाही मारले़ अलीकडे चीनने भारताचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे़ चीनचे सैन्य आपल्या भूभाग क्षेत्रात आला आहे़ आता संरक्षण तज्ज्ञांनीही आपला भूभाग चीनने ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे़ असे असताना पंतप्रधान मौन बाळगतात, हे आश्चर्यजनक आहे़ कालच २० जवान शहीद झाले़ यात कर्नल दर्जाचे अधिकारी होते़ ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता भारतीय लष्कराला सरकारकडून जे आदेश द्यायला हवे होते ते दिले नाहीत़ यामागे भारत सरकारची नेमकी मजबुरी काय? आहे याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी मागणी खा़ सातव यांनी केली़
एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदीच्या किनारी झोक्यावर बसवून चिनच्या राष्ट्रपतींना मेजवाणी दिली़ इतकेच नाही तर महाबलीपुरम येथे जाऊन चर्चा केली़ अलीकडे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़ या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़ हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे, असे म्हणावे लागेल. भारत सरकारने जशास तसे उत्तर देत चीनने बळकावलेला भूभाग ताब्यात घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खा़ राजीव सातव यांनी दिली़