वसमत : वसमतमध्ये हजारो मोकाट कुत्रे आहेत. आता त्यात भर पडली ती रोगग्रस्त कुत्र्यांची. शहरात शेकडो रोगग्रस्त कुत्रे फिरत आहेत. चामडी सोललेली ही कुत्री पाहून नागरिकही भयभीत होत आहेत. आता रोगट कुत्र्यांची ही नवी समस्या सोडवायची कोणी? हाच खरा प्रश्न आहे.
वसमत शहरात मोकाट जनावरांची संख्या लक्षणीय आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरलेले आहे. शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त आहेत. याची कोणतीही फिकीर नगरपालिकेला दिसत नाही, हे आपले काम नाही, असेच चित्र आहे. भरीस भर म्हणून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. गावात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येक गल्लीत किमान ५० ते ६० कुत्रे झुंडीने वावरत आहेत. मोकाट कुत्र्यांची एवढी दहशत आहे की, रात्रीच्या वेळी गावातून एकट्या दुकट्याला फिरण्याची हिंमत उरलेली नाही. कित्येक जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ले करून जखमीही केले आहे. आता या सर्व समस्यांपेक्षा भयानक समस्या सध्या उभी राहिली आहे. या मोकाट कुत्र्यांना चर्मरोग झालेला आहे.
या रोगाची लागण वाढत वाढत आता बहुतेक सर्वच कुत्र्यांना ही रोगाची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस वातावरणात उडत आहेत. केस झडत आहेत. व अंगावरील चामडे सोलून जात असून जखमा वाहत आहेत. त्याद्वारे दुर्गंधी पसरत आहे. शेकडोंच्या संख्येने कुत्रे गावात प्रत्येक गल्लीत, घरा-दारांसमोर फिरत आहेत. अशा रोगग्रस्त कुत्र्यांच्या सहवासात नागरिक येत असल्याने हा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र आता या रोगट कुत्र्यांच्या समस्येपासून नागरिकांना वाचवायचे कुणी? हाच खरा प्रश्न आहे. शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येपासून दूर पळणारी वसमत नगरपालिका मोकाट कुत्रे व रोगग्रस्त कुत्र्यांचा बंदोबस्त करील एवढा विश्वास नाहीच. ‘बिनफायद्याच्या कामात वेळ वाया घालायचा नाही’ एवढा मंत्र पाठ झाल्यासारखी अवस्था असल्याने वसमतमध्ये नगरपालिकेच्या गलथान कारभारालाच वैतागले आहेत. कुत्र्यांची बिमारी नागरिकांत पोहोचण्याची वाट पाहिली जात आहे काय? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. वसमत न.प.चे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
कत्तलखाने मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान वसमत शहरातील कत्तलखाने व उघड्यावर मांस विक्री करणारे केंद्र मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान झाले आहे. कत्तलखाना परिसरातील अवशेषावर या मोकाट कुत्र्यांचा उदरनिर्वाह होत आहे. अवशेष उकीरड्यांवर व गावाबाहेर रस्त्यांवर फेकण्यात येतात. मटन मार्केट परिसरातही घाणीचे साम्राज्य असते. या सर्व बाबी मोकाट कुत्रे वाढण्यास हातभार लावत आहेत. मांस विक्री केंद्राच्या सभोवताली मोठ्या संख्येने रोगग्रस्त कुत्रे मुक्तसंचार करत असल्याने अशा ठिकाणांवरून मांस घेणे व खाणे धोकादायक ठरण्याची भीती आहे. याद्वारे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पाहण्यास कोणासही वेळ नाही.
यासंदर्भात वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लालपोतू म्हणाले, या समस्येस गांभीर्याने घेण्याची आमची मागणी केली. शहरात हजारोंच्या संख्येने रोगग्रस्त कुत्रे मुक्तसंचार करत असतील तर ती समाजाच्या स्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा आहे. वेळीच नगरपालिका किंवा संबंधित यंत्रणांनी सावध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. -राजेंद्र लालपोतू
बंदोबस्त करावा- चौकडावसमतमध्ये वाढलेली कुत्र्यांच्या संख्येने व रोगट कुत्र्यांची संख्याही शहरासाठी त्रासदायक ठरत आहे. मुख्याधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. मोठ्या शहरात ज्याप्रमाणे कुत्रे पकडून बाहेर नेऊन सोडण्याची व्यवस्था असते. वसमतमध्येही हा प्रयोग करावा मुख्याधिकाऱ्यांनी यास संमती दिली असून, तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे नगरसेवक नवीनकुमार चौकडा यांनी सांगितले