गोरेगाव : गोरेगावसह परिसरात सध्या तूर काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. उधळीचा फटका बसलेल्या तूर उत्पादनात प्रचंड घट होताना दिसत आहे. खडकाळ जमिनीवरील तूर पीक तर रोगराईच्या घाल्यामुळे पूर्णपणे वाळून गेले. काही शेतकऱ्यांच्या पदरात केवळ तुराट्याच उरल्याचे वास्तव चित्र आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पन्नास फटका बसला असताना जोमात असलेल्या तुरीच्या उत्पन्नातून खरीप हंगामातील लागवड खर्च तरी निघेल, अशी आशा होती; परंतु तूर उत्पन्नात झालेल्या घटीने हातावर तुरी दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि कोरडे धुके त्यातच जमिनीतील बुरशीच्या प्रार्दुभावामुळे फुले आणि शेंगधारणेच्या अवस्थेतील सुमारे ६० टक्के तुरीचे पीक उधळून गेले असताना उत्पन्नात मोठी घट होत आहे. एकरी पाच ते सात किंटल उत्पन्नाची अपेक्षा असताना चांगल्या प्रतीच्या सुपीक शेतजमिनीत केवळ एक ते अडीच क्विंटलचा उतारा येत असल्याचे चित्र असून, कमी उत्पन्नामुळे मजूर तूर काढणीचे गुत्ते घेण्याचे टाळत आहेत. त्यांच्याकडून रोख रोजंदारीच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याने शेतकऱ्यांना काढणीसाठी मजुरी खर्चाचा शिल्लक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर काही कोरडवाहू माळरान शेतजमिनीवरील तूर पीक उधळीच्या घाल्यामुळे पूर्णत: वाळून गेले असताना शेतात फक्त तुराट्याच शिल्लक राहिल्याचे वास्तव बघता नापिकीच्या फटक्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रीया.
उधळीमुळे तूर पीक करपल्याने नाममात्र शेंगा शिल्लक राहल्या असून, सर्वत्र नुसत्या तुराट्याच दिसत आहेत. आठ एकर जमिनीत दरवर्षी २० ते २२ पोते उत्पन्न होत असताना यंदा फक्त साडेतीन पोतेच उत्पन्न झाले आहे.
संजय भुरभुरे
गोटवाडी शेतकरी
फोटो नं. ५