कडोळी (जि.हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील श्री रमतेराम महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कुंडलिक घुगरे यांच्यावर विषप्रयोग झाला असून त्यांना वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले. वाशिम येथे पोलिसांना त्यांनी दिलेल्या जबाबात मात्र कुणावरही शंका नसून यात संस्था चौकशी करून संबंधितांवर कारवाई करील, असे सांगितले.
माझोड येथील रहिवासी असलेले घुगरे हे १९९५ पासून या शाळेवर शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून नोकरीला आहेत. त्यांनी आपल्या घरूनच पिण्याचे पाणी बाटलीत भरून आणले होते. सुरुवातीला ते पाणी त्यांनी प्यायलेही होते. नंतर ते कामानिमित्त माझोड येथे घरी जाऊन परत आले. त्यानंतर घुगरे यांनी पाणी प्यायला घेतल्यानंतर एक -दोन घोट घेतल्यानंतर पाण्याची चव वेगळीच असल्याचे जाणवले. पाण्याला वासही येत होता. लगेच त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून या पाण्याचा वास येतो काय, हे पाहण्यास सांगितले. हे पाणी दुसऱ्या मगमध्ये ओतले तेव्हा पाण्याचा रंग पांढरा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथून वाशिम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू आहेत. याबाबत वाशिम पोलीस ठाण्यातील जमादार रामेश्वर इंगोले यांनी त्यांचा जबाब घेतला. तेव्हा आपला कुणावरही संशय नाही. यात कुणावर कारवाई करायची ते संस्था ठरवेल, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण गोरेगाव ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी शाळेत जाऊन पाहणी केली आहे.