हिंगोली : डेंग्यू ताप विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. ‘प्रिवेन्शन ऑफ डेंग्यू स्टार्टस् फॉर्म होम’ हे घोषवाक्य समोर ठेवून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. केंद्र शासनाने डेंग्यू विषयावर मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेले आहे. तसेच कोविड-१९ सोबत गृह भेटीद्वारे जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, तसेच डेंग्यू, चिकुनगुन्याबाबतची लक्षणे, उपचार, उपाययोजना, शासकीय योजनांची माहिती, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आदींविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडीताई यांनी सहभागी होत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करावा, असे आवाहनही डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.